परभणी प्रकरणी विधानसभेत, सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळणार का?


Parbhani Somnath Suryavanshi: परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युचे आज विधानसभेत पडसाद उमटले. विरोधकांनी या प्रकरणी कडक कारवाईची मागणी करत सभात्याग केला. सुर्यवंशी कुटुंबाला  न्याय मिळावा, सरकारने यासाठी ठोस पाऊल उचलावं अशी मागणी केली. परभणी प्रकरणी विधानसभेत काय घडलं.

परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर भीम अनुयायी आक्रमक झाले. यानंतर पोलिसांकडून सोमनाथ सुर्यवंशीला अटक केली. त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरात आंदोलनं, निदर्शने झाली. एवढ्यावरच न थांबता परभणी प्रकरण विधानसभेतही तापलं. विरोधकांनी सरकारला चहूबाजूंनी घेरत,  स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला.सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रश्नांची राळ उठवली. परभणीच्या प्रकरणात काहितरी वेगळा वास येतोय, याची सखोल चौकशीची मागणी नितीन राऊत यांनी केली.

 पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत, लोकांना न्याय मिळत नाही, सरकार करतंय काय असा सवाल उपस्थित केला. तर परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे. हा एक सुनियोजित कट होता, त्याची चौकशी झालीच पाहिजे.जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. परभणी प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनीही सरकारवर ताशेरे ओढले.सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीत झालाय, याचा तपास व्हावा असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

 कारवाईचा वेग वाढेल ही अपेक्षा

परभणीत दंगलीत अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी भीम अनुयायांनी आंदोलन करत सरकारला जाब विचारलाय.पोलिसी बळाचा वापर करत मारल्याचा आरोप होतोय.आता राजकीय पक्ष आणि नेतेही पुढे सरसावलेत.त्यामुळे कारवाईचा वेग वाढेल, हिच अपेक्षा.

परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक

परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक झालेत. आरोपींवर कारवाई करण्यासाठी  विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही गोंधळ झाला. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बीड, परभणी घटनेवरून सरकार गंभीर नाही, असा आरोप करत विरोधकांचा सभात्याग केलाय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *