पोस्ट खात्याकडून ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ सेवा अचानक बंद



भारतीय पोस्ट खात्याने ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ ही पार्सल सेवा अचानक बंद केली आहे. त्यामुळे देशभरातील लाखो पुस्तक विक्रेते अडचणीत सापडले आहेत. पोस्टाच्या या निर्णयामुळे पुस्तकांची ऑनलाईन खरेदी महाग होणार आहे.

पोस्टाने ही सेवा पूर्ववत करावी अशी मागणी देशभरातील पुस्तक विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आधी कोणतीही कल्पना न देताच पोस्ट खात्याने ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ ही सेवा बंद केल्याने पुस्तक विक्रेत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय पोस्ट खात्याची ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ ही सेवा तुलनेने स्वस्त होती. या सेवेचा वापर करून देशभरातील अनेक पुस्तक विक्रेते वाचकांना पुस्तके पाठवत असत. ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ या सेवेचे आता ‘बुक पोस्ट’ असे नामांतर करण्यात आले असून त्याचे दर वाढवण्यात आले आहे.

पूर्वी ‘रजिस्टर प्रिंटेड बुक्स’ सेवेद्वारे 30 रुपयांमध्ये 2000 ग्रॅमपर्यंतचे छापील पुस्तक पाठवण्याची सोय होती. आता ‘बुक पोस्ट’ या नव्या सेवेद्वारे 30 रुपयांत फक्त ५०० ग्रॅम वजनाचे पुस्तक पाठवता येणार आहे. त्यामुळे एरव्ही जे पुस्तकाचे एक पार्सल 30 रुपयात पाठवता यायचे त्यासाठी 62 रुपये लागणार आहेत. 

पोस्ट खात्यातर्फे त्यांच्या काही सेवांची नावे बदलण्यात आली आहे. तर काही सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. ‘VPP (vas) सर्विस’ या सेवेचे नाव बदलून COD -Retail असे करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरद्वारे पूर्वी 5000 रुपयापर्यंतची रक्कम पाठवता येत असे. आता त्याची कमाल मर्यादा 10 हजार रुपये करण्यात आली आहे.

इंडियन पोस्टल ऑर्डरचे (IPO) डिनॉमिनेशन्स पूर्वी 0.50 पैसे,  रु 1, रु 2, रु 5, रु 7, रु 10, रु 20, रु 50, रु 100 किमतीत उपलब्ध होते. आता याची संख्या कमी करण्यात आली असून ते फक्त रु. 10, रु. 20, रु. 50 आणि रु. 100 च्या मूल्यांमध्येच मिळणार आहे.


हेही वाचा

रे रोड केबल ब्रिज जानेवारी 2025 मध्ये खुला होणार?


मुंबईतील पहिले रोबोटिक कार पार्किंग बंद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *