[ad_1]
Home Loan Interest Rate: नुकत्याच पार पडलेल्या पतधोरण बैठकीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयनं (RBI) रेपो रेटमध्ये कपात केली आणि करसवलतीनंतर सामान्यांना मिळालेला हा दुसरा दिलासा ठरला. इथं आरबीआयनं अतिशय महत्त्वाची घोषणा केल्यानंतर आता देशातील 6 मोठ्या बँकांनी तातडीनं गृहकर्जावर असणारं व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 फेब्रुवारी रोजी आरबीआयनं MPC बैठकीनंतर रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी करत 0.25 टक्क्यांची कपात केली. ज्यामुळं हा रेपो रेट 6.25 टक्क्यांवर पोहोचला. गेल्या दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच आरबीआयनं रेपो रेट कमी करण्याता निर्णय घेतला आणि Home Loan घेतलेल्यांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, तिथं आरबीआयनं हा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच अनेक खासगी आणि सरकारी अख्तयारित येणाऱ्या बँकांनीही त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा अशा बँकांचा समावेश असून, त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 25 टक्क्यांनी कपात केली आहे.
Repo Linked Lending Rate (RLLR) म्हणजे काय?
‘रेपो लिंक्ड लेंडिंग रेट’ ही ती आकडेवारी असते जी थेट आरबीआयच्या रेपो रेटशी संलग्न असते. ऑक्टोबर 2019 मध्ये जेव्हा आरबीआयनं एक परिपत्रक जारी करत रिटेल लोनला बाह्य बेंचमार्क रेट (E-BLR)सह जोडण्याचे आदेश दिले होते. ज्यामुळं तेव्हापासूनच अधिकाधिक बँकासाठी रेपो रेट हा मुख्य घटक ठरला. ज्यामुळं जे ग्राहक RLLR कर्जाचा पर्याय निवडतात, त्यांच्या कर्जाच्या हप्त्यावर आरबीआयच्या रेपो रेट बदलांचा थेट परिणाम होतो. अर्थात कर्जाचं व्याज वाढतं किंवा कमी होतं. फ्लोटिंग होम लोनही याच प्रकाराशी संलग्न असतात.
कोणत्या बँकांनी कमी केले व्याजदर?
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदानं त्यांच्या बडोदा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (BRLLR)मध्ये बदल करत हे दर 8.90% इतके केले आहेत. 10 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू करण्यात आले.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियानं RLLR मध्ये घट करत हे दर 9.35% वरून 9.10% वर आणले आहेत. 7 फेब्रुवारीपासून हे दर लागू करण्यात आले.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडियानं RLLR चे दर 9.25% वरून 9.00% वर आणले आहेत. 11 फेब्रुवारीपासून हे दर लागू करण्यात आले.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेनं RLLR घटवून 9.25% हून 9.00% करण्यात आला आहे. 12 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू करण्यात आले.
पंजाब नॅशनल बँक
(PNB) पंजाब नॅशनल बँकेकडून RLLR चे दर 9.25% नं कमी करत 9.00% करण्यात आले आहेत. 10 फेब्रुवारीपासून हे बदल लागू झाले.
वरील बँकांनी RLLR कमी केल्यामुळं होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार असून, बँकांकडून दिलं जाणारं गृहकर्ज आणखी स्वस्त होणार आहे. शिवाय ग्राहकांकडून आकारला जाणारा कर्जाचा हप्तासुद्धा कमी होणार आहे. ज्यामुळं कर्जधारकांना इथं पैसे वाचवण्याची सहज मुभा मिळू शकते.
[ad_2]
Source link