[ad_1]
मुंबई, 26 जुलै : महाराष्ट्रातील पोलीस भरती कंत्राटी स्वरुपाची करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिलं आहे. हे आपण तात्पुरते घेत आहोत, ही काही परमनंट अरेंजमेंट नाहीये, असं फडणवीस म्हणाले आहेत. मुंबई पोलीस दलातील 10 हजार शिपायांची पदं रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, दरवर्षी 1500 पोलीस निवृत्त होतात पण 2019,2020,2021 मध्ये पोलीस भरती झालेली नाही. अपघात, आजार, कोरोनामुळे 500 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण राज्यात 14,956 शिपाई पदं, 2,174 शिपाई चालक पदं, तसंच एसआरपीएफची पदं भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 18,331 पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांमध्ये 7,076 पोलीस शिपाई पदं आणि पोलीस चालक संवर्गातील 994 पदं भरण्यात येणार आहेत. ही पदं भरल्यानंतरही काही पदं रिक्त राहणार आहेत. मुंबई पोलिसांमध्ये 7,076 पोलीस शिपाई पदं भरण्याची कार्यवाही सुरू आहे. भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी पोलीस शिपाई उपलब्ध होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. या कारणामुळे मुंबई पोलिसांनी 3 हजार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. या विनंतीनुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडूनच 3000 मनुष्यबळ प्रत्यक्ष भरती कालावधी किंवा 11 महिने जो कमी असेल त्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याची मान्यता देण्यात आली आहे. या तीन हजार कर्मचाऱ्यांकडून फक्त सुरक्षा विषयक कामकाज आणि गार्डची कामं करून घेण्यात येणार आहेत. कायदे विषयक अंमलबजावणी आणि तपासाचं काम या पोलिसांना देण्यात येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 3 हजारांचं हे मनुष्यबळ फक्त तात्पुरत्या स्वरुपाचं असून मुंबई पोलीस दलातील नियमित पोलीस शिपाई कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर या तीन हजार मनुष्यबळाची सेवा संपुष्टात येईल. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांकडूनच केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालयं, व्यावसायिक प्रतिष्ठानं आणि सार्वजनिक ठिकाणी यापूर्वीही सुरक्षा वापरली गेली आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यावेळी आपण 18 हजार जणांची भरती करत आहोत. कोरोना काळात पोलीस भरती न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. जास्तीत जास्त ट्रेनिंगची व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. धोके वाढत आहेत, त्यानुसार काही पोस्ट या कंत्राटी पद्धतीने भराव्या लागतील, कारण रोज नवीन धोके वाढत आहेत, पोलीस कधीही कंत्राटी असू शकत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या निवेदनावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पोलीस दलातून निवृत्त झालेले पण नियमात बसणाऱ्यांना अशा मंडळात घ्यावे, अशी सूचना केली. अनिल परब यांची सूचना लक्षात घेऊन त्याचा विचार केला जाईल, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link