विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 19 जुलै : हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसात काही दुर्घटना देखील समोर आल्या आहेत. मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील नॅशनल पार्क परिसरात आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेला तरुण पाय घसरून ओढ्यात पडला आणि ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. चंदन दिलीप शाहा (25 वर्ष) असं पुरात वाहुन गेलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेले माहितीनुसार, बारीक पायरी क्रांतीनगर भागातील एक तरुण आपल्या मित्रांसोबत नॅशनल पार्क मधील डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेला. मात्र, ओढा ओलांडत असताना त्याचा पाय घसरून तो पुराच्या पाण्यात पडला आणि वाहून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अँकर हुक आणि दोरीच्या मदतीने या तरुणाला शोधण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आला. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधार पडल्यामुळे आता ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. सहा महिन्याच बाळ हातातून निसटलं ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली होती. या लोकमधून उतरून एक महिला व एक व्यक्ति सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. त्या व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडले. नाल्यातील पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने ते बाळ वाहून गेले. बाळाचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. रात्री त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम पोचली होती. मात्र. अंधार असल्याने शोध कार्य पूर्ण होऊ शकले नाही. पाण्यात पडलेले बाळ अद्याप सापडू शकले नाही. यासंबंधात बाळ सापडल्याची चुकीची माहिती माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. ठाणे जिल्हा प्रशासनास मिळालेल्या माहितीनुसार अद्याप वाहून गेलेल्या बाळाचा तपास लागलेला नाही. वाचा –
मुंबईत पावसानं रडवलं, लोकलनं लटकवलं, ठाणे स्थानकावर तुफान गर्दी; VIDEO VIRAL उद्याही पावसाचा जोर कायम राहणार दिवसभर पावसाचा जोर कायम असताना भारतीय हवामान खात्याने उद्याही असाच पाऊस राहील, असा इशारा दिला आहे. 20 जुलैला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
News18लोकमत
पावसाच्या या इशाऱ्यामुळे उद्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासनाने तिथल्या परिस्थितीनुसार शाळांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.