विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 14 जुलै : चोरीचा एक धक्कादायक प्रकार बोरिवली भागातून समोर आला आहे. आरोपीने चोरलेली रिक्षा गहाण ठेऊन पैसे ट्रान्सफर कल्याने पोलिसांनीही डोक्याला हात लावला. यावेळी त्याने एक मोबाईलदेखील लांबवला होता. याप्रकरणी MHB पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. नवी आलम उस्मान खान (वय 30, रा. वरेली, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला 10 जुलै रोजी मीरा रोड येथील डाचकुलपाडा येथून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेतील रहिवासी आणि रिक्षाचालक दुर्गेश यादव यांनी 13 जून रोजी त्यांची रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांनी MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान ही रिक्षा चेंबूर येथे एका मनी ट्रान्सफरच्या दुकानाबाहेर आढळून आली. आरोपींनी रिक्षा गहाण ठेऊन सुरत, गुजरातमधील खात्यात 10,000 रुपये ट्रान्सफर केले होते. पुढील तपासात, पोलिसांनी मोबाईल सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) द्वारे आरोपीचा शोध घेतला आणि हे उघड झाले की आरोपी सुरत आणि काशिमीरा दरम्यान सतत प्रवास करत होते. 10 जुलै रोजी आरोपीचे लोकेशन डाचकुलपाडा, काशीगाव, मीरा रोड येथे शोधण्यात आले, जिथे तो जंगलात फिरताना आणि पत्ते खेळताना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून एक होंडा शाईन वाहन जप्त केले. वाचा –
टोमॅटो बेतले जीवावर! हातपाय बांधून शेतकऱ्याला संपवलं; धक्कादायक कारण समोर आरोपींनी मुंबईतील विविध ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले असून अनेक दुकानदारांची मनी ट्रान्सफर करून फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तीन, तसेच गोरेगाव पोलीस ठाणे, चेंबूर पोलीस ठाणे, बोरीवली पोलीस ठाणे, मीरा रोड पोलीस ठाणे आणि दहिसर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने दहिसर येथून दोन रिक्षा चोरल्या होत्या व त्या नायगाव व विरार येथील मनी ट्रान्सफरच्या दुकानात गहाण ठेवल्या होत्या, तेथून त्याने उत्तर प्रदेशातील कनोज येथे पैसे ट्रान्सफर केले होते. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन शिंदे, सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकाने तपास केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.