[ad_1]
RSS On India Pakistan War: भारत आणि पाकिस्तानदरम्यान भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये 7 मेपासून जोरदार संघर्ष सुरु असून ड्रोन्सबरोबरच हवाई आणि जमिनीवरुनही हल्ले केले जात आहेत. असं असतानाच आता या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक निवेदन जारी केलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि ंसंघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांच्या नावाने संघाने पत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे. संघाने नेमकं काय म्हटलंय पाहूयात…
देशाचा अभिमान
“पहलगाममधील भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन. हिंदू यात्रेकरूंच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढले आहे,” असं संघाने म्हटलं आहे.
दहशतवाद्यांवर कठोर कारवाई अनिवार्य
“आमचा असाही विश्वास आहे की पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल आहे. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश तन, मन आणि धनाने सरकार आणि सशस्त्र दलांसोबत उभा आहे,” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे.
सीमेवरील हल्ल्यांचा निषेध
“भारतीय सीमेवरील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो,” असं म्हणत संघांने सध्या सुरु असलेल्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
भारतीयांना आवाहन
“या आव्हानात्मक प्रसंगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासीयांना सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व माहितीचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन करतो. यासोबतच, या प्रसंगी, आपले नागरी कर्तव्य बजावताना, सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. सर्व देशवासीयांना विनंती आहे की त्यांनी आपली देशभक्ती प्रदर्शित करावी आणि आवश्यकतेनुसार सैन्य आणि नागरी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार राहावे आणि राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी द्यावी,” असं आवाहन संघाने सर्व भारतीयांना केलं आहे.
[ad_2]
Source link