भाजपाने तिरंगा यात्रेऐवजी ‘डोनाल्ड तात्या’च्या नावाने एक…; ठाकरेंची सेना म्हणते, ‘टेबलाखाली…’

[ad_1]

Shivsena On Tiranga Yatra: “भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सध्याचे नेतृत्व म्हणजे एक फसलेला तमाशा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचा उत्सव साजरा करण्याचे त्यांनी ठरवले असून देशभरात तिरंगा यात्रा काढण्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केली. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा निर्लज्ज प्रकार आहे,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. “पहलगाम हल्ल्याचा बदला पूर्ण झाला नसताना अशा यात्रा काढणे व राजकारण करणे कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही. मुळात ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण होण्याआधीच प्रेसिडंट डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी देऊन भारताला युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा पराभव निश्चित असताना पंतप्रधान मोदी यांनी व्यापाराच्या लोभापायी ट्रम्प यांची धमकी मान्य केली व युद्ध बंद केले. यात ‘सिंदूर’चा बदला कोठे पूर्ण झाला? त्यामुळे एकाच वेळी ‘सिंदूर’ आणि ‘तिरंगा’ यांचा अपमान या लोकांनी केला. तिरंगा यात्रा हे राजकीय थोतांड आहे,” अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

भाजपाने चालवलेला तमाशा भयंकर आणि निर्घृण

“भाजप अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी व त्यांच्या पक्षाने तिरंगा यात्रा काढून विजयाचा जल्लोष करणे म्हणजे सिंदूर गमावलेल्या त्या माता-भगिनींच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. भाजपने याउपर यात्रा काढलीच तर हाती अमेरिका व ट्रम्प यांचे झेंडे घ्यावेत व मोदींच्या बरोबरीने ट्रम्प यांचे फोटो बॅनर्सवर छापावेत,” असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे. “पुलवामाचे राजकारण केले तसे आता पहलगाम हल्ल्याचे व 26 भगिनींनी सिंदूर गमावल्याचे राजकारण भाजपने सुरू केले आहे. भाजपची नियत साफ नाही व ते रक्तपिपासू लोक आहेत याचा हा सबळ पुरावा आहे. 13 मे ते 23 मे या काळात ही तिरंगा यात्रा काढली जाईल व त्यात भाजपचे बडे नेते सामील होतील. मोदी वगैरे लोकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ कसे यशस्वी केले याची माहिती भारतीय जनतेला दिली जाईल. भाजपवाल्यांनी हा जो तमाशा चालवला आहे, तो भयंकर आणि निर्घृण आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

पाकिस्तानला धडा शिकविल्याचे प्रवचन निरर्थक

“खरे तर पहलगाम हल्ल्याबद्दल सगळ्यात आधी गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी सगळ्यात आधी या निष्क्रिय आणि कपटी गृहमंत्र्याला हटवायला हवे होते व त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ खरेच यशस्वी झाले काय या आत्मचिंतनासाठी 12 तास केदारनाथच्या गुहेत जाऊन कॅमेऱ्याशिवाय बसायला हवे होते. भारताने पाकिस्तानला धडा शिकवला नाहीच. उलट डोनाल्ड ट्रम्प यांची गुलामी पत्करली. इंडिया गेटसमोर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गुजरातेत सरदार पटेल यांचा पुतळा उभारणाऱ्या या लोकांचे ढोंग साफ उघडे पडले आहे. सोमवारी रात्री देशाला संबोधन वगैरे करताना मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकविल्याचे जे प्रवचन झोडले ते निरर्थक आहे,” अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

टेबलाखाली व्यापाऱ्यांचा सौदा झाला

“भाजप अनेक उत्सव साजरा करत असतो. आता त्यांनी ‘डोनाल्ड तात्या’च्या नावाने एक कार्निव्हल भरवून त्यात सामील व्हावे. तिरंगा यात्रा कसली काढताय? भारतीय सैन्य पाकिस्तानवर चढाई करायला सज्ज असतानाच डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या मदतीला धावतात व सार्वभौम भारत राष्ट्राला युद्धभूमीतून माघार घ्यायला लावतात. युद्ध पाकिस्तानच्या दहशतवादापासून सुरू झाले आणि अमेरिकेच्या व्यापारापर्यंत येऊन थांबले. टेबलाखाली व्यापाऱ्यांचा सौदा झाला. त्यात सिंदूरही विकले गेले. तिरंग्याचा सौदाच झाला व आता तिरंग्याची यात्रा काढून भाजपवाले लोकांना मूर्ख बनवत आहेत. तिरंगा हाती धरण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावला आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *