वसईतील नायगावमध्ये पुन्हा बेकायदेशीर चाळींचे काम सुरू



नालासोपारा  (nala sopara) येथे 41 अनधिकृत इमारती बांधून चर्चेत आलेला भूमाफिया आणि बविआचा माजी नगरसेवक सिताराम गुप्ता नायगाव (naigaon) मध्ये बेकायदेशीर चाळी बांधत असल्याचे उघड झाले आहे.

सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करून तसेच खारफुटींच्या (mangroves) झाडांची कत्तल करून बेकायदेशीर चाळी बांधल्या जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील विविध विकासकामांसाठी आरक्षित असलेल्या 41 अनधिकृत इमारतींचे (illegal) प्रकरण सध्या गाजत आहे.

सर्वोच्च न्यायालायने या इमारती बेकायदेशीर ठरवल्यानंतर वसई- विरार महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. या 41 इमारतीत 2 हजारांहून अधिक कुटुंबे रहात असून त्यातील रहिवाशी बेघर झाले आहेत. आता पर्यंत 7 इमारती पाडण्यात आल्या आहेत.

यातील 8 वी इमारत खाली करण्यात आली आहे. या इमारतींमधील 50 हून अधिक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या अनधिकृत इमारती बांधणारा भूमाफियास सिताराम गुप्ता याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मात्र रहिवाशी बेघर होत असताना सिताराम गुप्ता मात्र मोकाट आहे. तसेच तो नव्याने बेकायदेशीर चाळीही बांधत असल्याचे समोर आले आहे.

नायगाव पूर्वेच्या जुचंद्र येथील भूमापन क्रमांक 283 ही जागा सागरी नियंत्रण क्षेत्रात (CRZ) मध्ये येते. ही जागा सिताराम गुप्ता याने विकत घेतली आहे. तसेच तो त्यावर बेकायदेशीर चाळी बांधत आहे. या पाणथळ जागेवर मोठ्या प्रमाणवार मातीचा भराव करण्यात आला आहे.

या चाळी बांधण्यासाठी येथील खारफुटीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे, अशी तक्रार भाजपाच्या वसई विरार स्लम सेलचे महामंत्री रामअवतार यादव यांनी केली आहे. या ठिकाणी बेकायदेशीर चाळी बांधल्या जात आहेत.

सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन होत आहे याशिवाय खारफुटीच्या झाडांची कत्तल होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत मी 8 वेळा महापालिकेकडे ऑनलाईन तक्रारी केल्या आणि 5 वेळा लेखी तक्रारी दिल्या तरी कारवाई झालेली नाही असा आरोप यादव यांनी केला.

सिताराम गुप्ता हा बहुजन विकास आघाडी पक्षाचा माजी नगरसवेक आहे. 41 बेकायदेशीर इमारतीप्रकरणात 2023 च्या अखेरिस त्याला अटक झाली होती. परंतु साडेतीन महिन्यातच तो जामिनावर सुटला आणि पुन्हा अनधिकृत बांधकामात सक्रीय झाला आहे.

आम्ही या जागेचा पंचनामा केला आहे. पाणथळ जागेवर बेकायदेशीर रित्या भराव केल्याचे आढळून आले आहे. आम्ही याप्रकरणी कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे, अशी माहिती मंडल अधिकारी अरूण मुर्ताडक यांनी दिली.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *