मूळच्या झारखंडच्या असणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा मुंबईतील वरळी इथं शनिवारी धक्कादायक मृत्यू झाला. सूरज नारायण यादव असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. घटनास्थळी तो साधारण तीन ते चार महिन्यांपासून कामावर रुजू झाला होता.
वरळीतील सचिन कोठेकर (32) यांच्या मालकीच्या चायनीज स्टॉलवर हा 19 वर्षी युवक काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकल्याने हा कर्मचारी आत ओढला गेला. ज्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात आलं. वरळी येथील नरिमन भाट नगर इथं ही घटना घडली असून, यामध्ये 19 वर्षीय सूरज यादवचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.
‘ही घटना तेव्हा घडली ज्यावेळी तो युवक चायनीज पदार्थ बनवण्यासाठी तिथं काम करत होता. यापूर्वी त्याचा या कामाचा कोणताही अनुभव नसून, यंत्र हाताळण्याची माहितीसुद्धा नव्हती. पण, कोठेकर यांनी कथित स्वरुपात सुरक्षिततेसंदर्भातील निकषांचं पालन आणि प्रशिक्षण नसतानाही त्याला या यंत्रावर काम करण्यास सांगितलं’, असं वृत्त पोलिसांनी दिलेल्या माहितीतून मिळालं.
सदर घटनेनंतर दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरील घटना CCTV कैद झाल्याचंही म्हटलं गेलं.
हेही वाचा
सीएसएमटी येथे बेस्ट बसने एकाला चिरडले