माटुंगा स्थानकाच्या बाहेर 22 मजली रोबोटिक पार्किंग टॉवर उभारण्याच्या योजनेला मनसेने देखील विरोध केला आहे. स्थानिकांना पाठिंबा देत, त्यांनीही या प्रकल्पाला असुरक्षित न्हटले आहे.
मनसेने बीएमसीला पत्र लिहून हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची विनंती केली आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, हा प्रकल्प एका विकासकाच्या फायद्यासाठी हाती घेण्यात आला आहे.
मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पत्रात असे लिहिले आहे की, “माटुंगा स्थानकाला फक्त एकच एक्झिट आहे आणि दररोज सुमारे 30,000 प्रवासी ये-जा करतात. या परिसरात पाच-दहा शाळा आणि महाविद्यालये आणि फळे आणि भाजीपाला मार्केट आहेत. त्यामुळे तिकडे गर्दी अधिक जमते.” एवढ्या गजबजलेल्या जागेत पार्किंग टॉवर उभारले आणि कोणतीही आपत्ती ओढवली तर रेल्वे प्रवासी कसे सुटतील, असा सवाल जाधव यांनी केला.
“यावर बीएमसी किंवा अग्निशमन दलाने विचार केलेला नाही,” असे पत्रात म्हटले आहे. त्यात पुढे लिहिले आहे की, “माटुंग्यात सध्या चार-पाच पार्किंग प्लॉट आहेत. त्यामुळे आम्ही बीएमसीच्या दुसऱ्या पार्किंग टॉवरच्या प्रकल्पाला विरोध करतो आणि हा प्रकल्प त्वरित रद्द करण्याची विनंती करतो.”
माटुंगा स्थानकाबाहेरील 1,518 चौरस मीटरच्या भूखंडावर, यांत्रिकीकृत बहु-स्तरीय पार्किंग टॉवर प्रकल्पाचा प्रस्ताव भाजपचे माजी नगरसेवक नेहल शाह यांनी मांडला आहे. या योजनेला नुकतेच मध्य रेल्वेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.
हेही वाचा
वांद्रे रेल्वे स्टेशन-वांद्रे कॉलनी मेट्रो स्टेशन दरम्यान बस सेवा सुरू