‘…हाच प्रश्न सावरकरांचा आत्माही विचारत असेल’, UBT चा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘गोडसेच्या अस्थीही…’

[ad_1]

Idea of India By Veer Savarkar: “वीर सावरकरांचे ‘अखंड हिंदुस्थान’चे स्वप्न पूर्णत्वास न्यायची संधी पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारने गमावली आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. “आता भक्तांनी सूत्रांच्या हवाल्याने अशा बातम्या पसरवल्या आहेत की, पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानकडे उरलेल्या कश्मीरची मागणी केली आहे. ‘‘पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर परत मिळवणे हेच आमचे लक्ष्य आहे. आधी ‘पीओके’ आमच्या ताब्यात द्या, मगच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते,’’ अशा शब्दांत मोदींनी ठणकावले, पण त्यांनी नक्की कोणाला व कधी ठणकावले याचा तपशील नाही. पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर परत मिळवून वीर सावरकरांना मानवंदना देण्याची तयारी भारतीय फौजांनी सुरू केली होती. आणखी चार दिवस युद्ध झाले असते तर भारताचे पाऊल पाकच्या कब्जातील कश्मीरवर पडलेच असते, पण प्रसिडंट ट्रम्प यांनी सत्यानाश केला,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

नकली सावरकर भक्तांनी…

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने वीर सावरकरांचा विचार सोडला असे भाजप, मिंधे गटाचे लोक सांगतात. त्यांनी आता प्रेसिडंट ट्रम्प यांचे पुतळे अमेरिकन वकिलातीसमोर जाळायला हवेत. कश्मीरपासून रामेश्वरमपर्यंत, सिंधपासून आसामपर्यंत एक आणि अविभाज्य भारताची संकल्पना वीर सावरकर यांनी मांडली होती. वीर सावरकरांचे स्वप्न स्पष्ट आणि निर्मळ होते. पंतप्रधान मोदी व त्यांचे मिंधे लोक वीर सावरकरांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत असतात. ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा जहाल मंत्र वीर सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात दिला होता, पण नकली सावरकर भक्तांनी अखंड भारतासाठी लढणाऱ्या सैन्याच्या हातातील बंदुकाच म्यान करायला लावल्या,” असा घणाघात ठाकरेंच्या पक्षाने केला आहे.

कच का खाल्ली?

“अखंड हिंदू राष्ट्र हे कोणी दान देणार नाही. ते लढून, युद्ध करूनच आपल्याला मिळवावे लागणार आहे. हिंदू राष्ट्र हा हिंदुत्वाचाच एक अंश आहे. ‘‘आसिन्धु सिन्धु पर्यन्ता यस्य भारत भूमिका’ यावर हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राचा विश्वास असल्याचे वीर सावरकरांनी सांगितले होते. पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरिति स्मृतः।। जो कोणी सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीस आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू आहे, अशी सावरकरांची व्याख्या होती. वीर सावरकर हे अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते व पंतप्रधान मोदी, अमित शहा, महाराष्ट्रातले मिंधे वगैरे लोक हे वीर सावरकरांच्या अखंड विचारांचे समर्थक, पण तो अखंड विचार दृष्टिक्षेपात येत असताना या सर्व लोकांनी कच का खाल्ली? हे एक गौडबंगालच म्हणायला हवे,” असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलंय.

नथुराम गोडसेच्या अस्थींचे विसर्जन करता आलं असतं

“गांधीजींनी फाळणीस मान्यता दिल्यामुळेच आमच्या छाताडावर पाकिस्तान बसले या रागातून नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली, असे गोडसे समर्थक सांगतात. पुढे गोडसेला फाशी झाली, पण गोडसेच्या इच्छेनुसार त्याच्या अस्थींचे विसर्जन केले गेले नाही. जेव्हा अखंड भारत होईल तेव्हाच माझ्या अस्थींचे विसर्जन करा असे नथुराम गोडसेचे इच्छापत्र आहे. मोदी काळात गोडसे विचारांना मान्यता मिळाली व गोडसेच्या जयंत्या मयंत्याही साजऱ्या होत आहेत, पण अचानक युद्धविराम मान्य न करता युद्ध आणखी चार दिवस पुढे नेले असते तर कश्मीर, लाहोर, कराची पाडून भारतात जोडता आले असते व गोडसेच्या अस्थींचे विसर्जन करता आले असते. ते पुण्यही मोदी भक्तांनी गमावले आहे. मोदी व त्यांच्या लोकांना वीर सावरकरांचे स्वप्नही साकारता आले नाही आणि गोडसेच्या अस्थीही विसर्जित करता आल्या नाहीत,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

बलुचिस्तानचा तुकडा पाडून…

“आम्ही सावरकरांच्या कल्पनेतील अखंड भारत अस्तित्वात आणू या वल्गनाच ठरल्या. वीर सावरकरांच्या कल्पनेतील अखंड हिंदू राष्ट्राचे भविष्य देशाच्या स्वातंत्र्य युद्धात खंडित झाल्यावरही सावरकर म्हणाले होते की, ‘‘हे सिंधू, मी तुला विसरणार नाही. मग मी वेडा ठरेन अगर भविष्यवादी ठरेन.’’ या त्यांच्या स्मरणीय उद्गाराने आम्ही व्यथित झालो. आम्हाला याक्षणी वीर सावरकरांच्या अंतःकरणातील खोल खोल ध्येयवादाची मूर्ती दिसते ती आजच्या राजकीय कोलाहलात, निवडणुकांच्या घोषणांत, व्यापारात मावण्यासारखी किंवा रेखाटण्यासारखी नाही. युद्ध थांबविण्याआधी पाकच्या ताब्यातील कश्मीर तरी घ्यायला हवे होते. गेलाबाजार बलुचिस्तानचा तुकडा पाडून सूड घ्यायला हवा होता,” अशी अपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

वीर सावरकरांचे नाव घेऊन…

“भारतीय सैन्याने युद्धात आपल्या वीरांचे बलिदान दिले, नागरिकांनी प्राण गमावले, पण हाती काय पडले? पाकव्याप्त कश्मीर द्या, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी केली ही एक बातमी आली. ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत. ‘‘पाकिस्तानने पुन्हा गोळी चालवली तर तुम्ही ‘गोला’ म्हणजे बॉम्ब चालवा,’’ असे एक टाळीचे वाक्य पंतप्रधान मोदींनी फेकले. मुळात पाकड्यांना गोळ्या चालवण्यासाठी जिवंत का सोडले? हाच प्रश्न वीर सावरकरांचा आत्माही विचारत असेल. वीर सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार मोदी, मिंधे वगैरेंनी गमावला आहे. सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न आताच साकार झाले असते. मोदी व त्यांच्या लोकांनी ती संधी गमावली आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *