मुंबई, 28 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनातही राष्ट्रवादीचा एक गट सत्ताधारी बाकावर एक गट विरोधी बाकावर आहे. अशातच पवार काका-पुतण्याची भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गट पडले आहे. एक गट अजित पवार यांच्यासोबत आहे. तर दुसरा गट हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे. अहमदनगरमधील कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत आहे. मागील तीन दिवसांपासून रोहित पवार आपल्या आक्रमक भूमिकेमुळे कायम चर्चेत आहे. अशाच आज रोहित पवार हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचले.
News18लोकमत
रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विधिमंडळातील अजित पवार यांच्या दालनात जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. स्पर्धा परीक्षा शुल्क, कर्जत-जामखेडमधील एमआयडीसी यासह विविध मुद्द्यांवर रोहित पवारांनी अजित पवारांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान या दोन्ही दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवण केलं. राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध जपल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
(विधानसभा विरोधी पक्षनेता कधी ठरणार? नाना पटोले यांनी एका वाक्यात संपवला विषय)
राज्यात सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांकडून 1 हजार रु शुल्क याप्रमाणे एकाच परिक्षेसाठी खासगी कंपन्या 100 कोटीहून अधिक रुक्कम जमा करतात. MPSC चं बजेट 60 कोटी असताना एकाच परिक्षेसाठी खासगी कंपनी 100 कोटी रुपये आकारत असेल तर ही विद्यार्थ्यांची लूट आहे. ती थांबवण्यासाठी MPSC ला आर्थिक पाठबळ देऊन सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात आणि या प्रक्रियेसाठी वेळ लागत असेल तर खासगी कंपनीमार्फत परिक्षा घेताना उमेदवारांकडून केवळ 100 रुपये आकारुन उर्वरीत शुल्क सरकारने भरण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून केली. तसंच विद्यार्थ्यांवरील परीक्षा शुल्काचा भार कमी करण्यासाठी राजस्थान सरकारच्या धर्तीवर one time registration system सुरू करण्यासंदर्भात विचार करण्याची विनंतीही यावेळी केली. यासंदर्भात त्यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. तसंच. या भेटीदरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. मात्र अधिवेशनादरम्यान झालेली पवार-काका पुतण्याची भेट आणि लंच पे चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :