मुंबई, 28 जुलै : मुंबई, ठाणे, उपनगर आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. पहाटेपासूनच पावसाचं धुमशान सुरू झालं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू आहे. काल मुसळधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडाली. सलग दुसऱ्या दिवशीही अति मुसळधार पाऊस सुरू असून आजही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तुम्ही ऑफिसला किंवा कामासाठी घराबाहेर पडणार असाल तर छत्री, रेनकोट आणि फोन पूर्ण चार्ज करुनच घराबाहेर पडा. याशिवाय नियोजित वेळेच्या अर्धा ते पाऊणतास आधी घराबाहेर पडणं उत्तम राहील. याचं कारण म्हणजे लोकल सेवा उशिराने सुरू आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाल्याने रस्त्यांवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. सेंट्रल रेल्वेनं ट्विट करुन लोकल रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत माहिती दिली आहे. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेवर २०-२५ मिनिटे लोकल उशिराने आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक 12 ते 15 मिनिट उशिराने धावत आहे. ठाणे वाशी, नेरुळ बेलापूर खारकोपर लाईन सुरळीत सुरू आहे. गोरेगाव सीएसएमटी पनवेल मार्गावरही ट्रेन हार्बर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहे. उशिरा लोकल सुरू असल्याने ऑफिसला पोहोचणाऱ्यांना लेट मार्कचा सामना करावा लागत आहे.
News18लोकमत
तिन्ही मार्गांवर वाहतूक सध्या सुरू असली तरी तुम्ही वेळ राखूनच बाहेर पडा. मुंबई पावसाचा जोर वाढत असल्याने घराबाहेर पडण्याआधी लोकल किंवा वाहतुकीचे अपडेट्स न विसरता चेक करा. मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून नागरिक, विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :