पालघर, 28 जुलै, राहुल पाटील : पालघरमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सूर्या, वैतरणा, पिंजाळ, गारगाई नद्यांना पूर आला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो गावांचा मुख्य बाजारपेठांशी संपर्क तुटला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून 68 हजार क्यूकेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चाकरमान्यांचे हाल दरम्यान पालघर जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं त्याचा मोठा परिणाम हा वाहतुकीवर झाला आहे. घरातून ऑफीससाठी निघालेल्या चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याचं चित्र आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
Weather Update: राज्यात आज पावसाचा जोर ओसरणार की वाढणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता. मागील दोन दिवसांच्या तुलनेच आज पावसाचा जोर काहीसा ओसरणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुणे, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यांत आजही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.