मुंबई 21 जुलै : भारतीय रेल्वेनं प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्यासाठी 2019 वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी सुरू केली. वंदे भारतमधून प्रवास करताना आता थकवाही जाणवणार नाही कारण वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या दिमतीला हजर होत आहे. ‘नवभारत टाइम्स’ने या बाबत वृत्त दिलंय. देशातील पहिली स्लीपर व्हर्जन वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावू शकते. या ट्रेनचा ‘प्रोटोटाइप’ हा इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) येथे तयार केला जातोय. आयसीएफ कंपनीला 86 वंदे भारत ट्रेन बनवण्याचं कंत्राट दिलं होतं, त्यापैकी 9 ट्रेन स्लीपर व्हर्जनच्या आहेत. स्लीपर व्हर्जनचा प्रोटोटाइप लवकरच पूर्ण होईल. या शिवाय पुढील चार वर्षांत रेल्वेला देशभरात एकूण 400 वंदे भारत ट्रेन सुरू करायच्या आहेत. यामध्ये वंदे भारत सीटिंग व्हर्जन, वंदे भारत स्लीपर व्हर्जन आणि वंदे भारत मेट्रो व्हर्जन ट्रेनचा समावेश आहे. या गाड्या राजधानीसह विविध मार्गावर धावतील. तर, दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई-दिल्ली मार्गावर धावू शकते.
Rishikesh : साहसप्रेमींसाठी ऋषिकेश बेस्ट! येथे पर्यटक ‘या’ खेळांचा घेऊ शकतात आनंद
म्हणून मुंबई-दिल्ली मार्गाची निवड पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी मुंबई-दिल्ली मार्ग निवडण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-दिल्ली मार्ग हे नेहमीच रेल्वेसाठी महत्त्वाचे राहिलेत. या मार्गावर देशातील सर्व प्रीमिअम गाड्या धावतात. 1972 मध्ये या मार्गावर राजधानी एक्स्प्रेस चालवण्यात आली होती, जी आता तेजस-राजधानी एक्सप्रेस ट्रेन झालीय. देशातील पहिली खासगी तेजस एक्सप्रेस ट्रेन देखील मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावते. या मार्गावर एसी डबल डेकर ट्रेनही धावत असून देशातील पहिली हायस्पीड म्हणजेच बुलेट ट्रेनचा मार्गही आता मुंबई-अहमदाबाद असा तयार करण्यात येतोय. मुंबई-दिल्ली मार्गावर विमानसेवा असो की रेल्वेसेवा, त्यांना नेहमीच मागणी असते. कारण या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठीही मुंबई-दिल्ली मार्गाची निवड करण्यात आलीय. तसेच या मार्गावर पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचं आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका. या निवडणुकांचा विचार करून रेल्वे याबाबत निर्णय घेऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, ‘या संपूर्ण मार्गाचा एक मोठा भाग गुजरातमधून जातो. हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.’ मिशन रफ्तारचं कामही अंतिम टप्प्यात मुंबई ते दिल्लीदरम्यान मिशन रफ्तारचं कामही जवळपास अंतिम टप्प्यात आहे. या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मिशन रफ्तार अंतर्गत मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवासाचा वेळ 16 तासांवरून 12 तासांवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2017-18 मध्ये या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली होती. या प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकचे मजबुतीकरण, पुलांचे मजबुतीकरण, ओएचईचे आधुनिकीकरण, ट्रॅकच्या दोन्ही बाजूला फेन्सिंग करणं आदी कामांचा समावेश आहे. संपूर्ण मार्ग ताशी 160 किमी वेगासाठी सक्षम करणं हे या प्रोजेक्टचं मुख्य उद्दिष्ट आहे. काय आहे सध्याची परिस्थिती? मिशन रफ्तारचं काम हे वेगानं सुरू आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत सध्या मुंबई सेंट्रल ते नागदा दरम्यानच्या 694 किमी लांबीचं काम सुरू आहे. मुंबई सेंट्रल ते नागदा व्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेच्या अखत्यारितील बडोदा ते अहमदाबाददरम्यान सुमारे 100 किमीचे काम सुरू आहे. या संपूर्ण कामासाठी 3,227 कोटी रुपये खर्च करण्यात येतोय. यामध्ये 195 किमीपर्यंत संरक्षण भिंत बांधायची होती, त्यापैकी 30 किमीचं काम पूर्ण झालंय. मुंबई ते अहमदाबाद या 570 किमीपैकी 474 किमीचे मेटल बॅरियर फेन्सिंगचे काम पूर्ण झालंय. याशिवाय पश्चिम मध्य रेल्वेच्या वतीनं नागदा ते मथुरा या 545 किमीच्या मार्गावर काम करण्यात येतेय. यासाठी 2,664 कोटी रुपये खर्च केले जातील. तर, उत्तर मध्य रेल्वे मथुरा ते पलवल 82 किमीचे आणि पलवल ते दिल्ली हे 57 किमीचे काम करीत आहे. मिशन रफ्तार प्रोजेक्टला 2017-18 मंजुरी मिळाली होती. या प्रोजेक्टसाठी एकूण खर्च हा 6,679 कोटी रुपये असून मार्गाची लांबी 1,478 किलोमीटर आहे. या प्रोजेक्टमुळे रेल्वेचे 186 लेव्हल क्रॉसिंग गेट बंद होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.