तुषार रुपणवार, प्रतिनिधी मुंबई, 17 जुलै : राज्यात सत्तेमध्ये तिसरा भिडू सहभागी झाला आहे. त्याचवेळी विधानसभेचे पावसाळी अधिवेशनही सुरू झालंय. अशात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस येऊ घातला आहे. येत्या 22 जुलैला फडणवीस यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांची सेलिब्रेशनसाठी तयारी सुरू होती. मात्र, त्याचवेळी पक्षाकडून महत्त्वाचा आदेशवजा इशारा आला आहे. फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे. होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी विविध सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी दिली. वाचा –
अपात्रतेच्या नोटीसची मुदत संपली, ठाकरे गटाकडून उत्तर नाही, अध्यक्ष उचलणार पुढचं पाऊल! आजपासून पावसाळी अधिवेश महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हे अधिवेशन मुंबईत पार पडत असून 15 दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, 17 जुलैपासून सुरु झालेलं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधक एकवटले असून राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन होणार आहे. विरोधक कोणत्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार, सरकारकडून उत्तरे कशी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
News18लोकमत
राष्ट्रवादीत हालचालींना वेग अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्याचे पहिलेच विधानसभा अधिवेशन सुरू झालं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले सर्व आमदारांनी सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.