मुंबई, 16 जुलै, विनोद राठोड : मोठी बातमी समोर येत आहे. आज अजित पवार गटानं शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनजय मुंडे असे राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री उपस्थित होते. अजित पवार गटाच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? मी अंबादास दानवे यांच्या बैठकीमध्ये होतो. अचानक मला फोन आला. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी जे काही केलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. जे घडलं त्यातून मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र यावर शरद पवार काहीच बोलले नाहीत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आमचा सरकारला पाठिंबा नाही, त्यामुळे आमच्या बैठकीची व्यवस्था विधानसभाध्यक्षांनी करावी. ही भेट अचानकपणे झाली, भेटीचा नेमका काय उद्देश होता हे मला माहिती नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो. सर्वांनी नमस्कार करुन आशिर्वाद मागितला. शरद पवार यांना विनंती केली, की एनसीपी एकसंघ कसा राहू शकतो असा प्रयत्न करावा. मात्र यावर शरद पवार यांनी कुठलही उत्तर दिलं नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :