अजित मांढरे/ मुंबई, 16 जुलै : भाजपचं एक पोस्टर प्रचंड व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये गटारी अमावस्येनिमित्त कोंबडी वाटप करण्यात येणार असल्याचा मजकूर छापण्यत आला आहे. या पोस्टरवर कोकण विकास आघाडीचं नाव आहे. सोबतच या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा फोटो देखील आहे. भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर आणि चेतन देवळेकर यांचं आयोजक म्हणून या पोस्टरवर नाव आहे. सोबतच मुंबई सचिव सचिन विद्याधर शिंदे यांचं नाव देखील या पोस्टरवर आहे. मात्र हे पोस्ट कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशातून व्हायरल केल्याचं आता समोर आलं आहे. याबाबत भाजपचे मुंबई सचिव सचिन विद्याधर शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण अशाप्रकारचा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘गेली कित्येक वर्ष दादर माहीम विभागात मी कार्यरत असून पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. असे असताना काही खोडसाळ प्रवृत्तींनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी कोंबडी वाटपासारख्या एका निंदनीय उपक्रमात माझ्या फोटोचा वापर माझ्या परवानगी शिवाय करून, ते पोस्टर व्हायरल केलं आहे.
अशा स्वरुपाचा कोणताही कार्यक्रम घेण्यास मी सांगितले नव्हते. तसेच याला माझा कोणताही पाठिंबा किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य नव्हते. मी स्वतःही या प्रकाराची चौकशी करत आहे. तसेच ज्यांनी कोणी जाणूनबुजून हा प्रकार केला आहे त्यांना योग्य त्या कारवाईला सामोरे जावे लागेल’ असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :