TikToker Kubra Suicide: स्वतःशीच लग्न करणाऱ्या तुर्की येथील टिकटॉकर कुब्रा अयकुत हिने आत्महत्या केली आहे. कुब्राच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी कुब्राच्या लग्नाचा व्हिडिओही खूप चर्चेत आला होता. रिपोर्ट्सनुसार, कुब्राने तुर्कीतील एका अलिशान अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. कुब्राने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटदेखील लिहली होती.
कुब्राने सुसाइड नोटमध्ये तिच्या आत्महत्येचं कारण सांगितलं आहे, तिने म्हटलं आहे की, मला अजून जगायची इच्छा नाहीये. फिस्टिकची काळजी घ्या. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात सगळ्यांसोबत चांगलं वागले. मात्र मी स्वतःसाठी चांगली ठरू शकली नाही. एक चांगला मनुष्य म्हणून आयुष्य जगूनही मला काहीच मिळालं नाही. या जगात स्वार्थीच असायला हवं तेव्हाच तुम्ही आनंदी राहाल,’ असं तिने म्हटलं आहे.
मी कित्येक दिवस संघर्ष करतेय मात्र कोणीही लक्ष दिले नाही. मी आता जातेय कारण माझं स्वतःवर खूप प्रेम आहे आणि एकदा तरी मला स्वतःचा विचार करायचा आहे. मला माफ करा, कुब्रा अयकुत आता तुला किती आश्चर्य वाटत असेल हो ना, असंही कुब्राने तिच्या सुसाइड नोटमध्ये लिहलं आहे.
कुब्राच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. ही घटना इस्तांबुलच्या सुल्तानबेलीच्या हसनपासा परिसरातील आहे. कुब्राच्या आत्महत्येनंतर पोलिस दरवाजा तोडून घरात शिरले. त्यानंतर पोलिसांनी कुब्राच्या सुसाइड नोटमध्ये तिच्या मोबाईलचा पासवर्ड सापडला. त्यानंतर पोलिसांनी कुब्राच्या मोबाइलचा अॅक्सेस घेतला आणि 5 तासापूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाउटवर शेअर कऱण्यात आलेल्या फोटोपर्यंत पोहोचले. त्यात ती घराची साफसफाई करत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
कुब्रा अयकुतची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग आहे. कुब्राचे टिकटॉकवर एक मिलियन आणि इन्स्टाग्रामवर 200,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. लग्न सोहळ्यात कुब्राने एक पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि एक टियारा परिधान केला होता. जेव्हा तिने स्वतःसोबत लग्न केले तेव्हा खूप चर्चा झाली होती. तिने म्हटलं होतं की मला स्वतःसाठी योग्य नवरदेव मिळत नव्हता म्हणून मी स्वतःशीच लग्न करतेय.