Kerala Tribal Air Hostess Gopika Govind: आपण आपल्या आजुबाजूला अनेकांना चांगल्या पदावर काम करताना पाहतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. पण त्यांची त्या पदावर पोहोचण्याची सुरुवात एक छोटे स्वप्न पाहण्यापासून झालेली असते. छोटसं स्वप्न, त्यासाठी घेतलेली मेहनत आणि अनेक संकटे आली तरी राखलेले सातत्य हे त्यांच्या यशाचं गुपित असतं.
स्वप्न पाहणं सोपं असतं ते पूर्ण करणं तितकेच कठीण आहे. पण कठीण स्वप्ने सत्यात उतरल्यावर यशाचा आनंद काही औरच असतो. केरळमधील एका तरुणीने बालपणी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे.
गोपिका गोविंद असे या तरुणीचे नाव असून आहे. तिचे स्वप्न संपूर्ण केरळ राज्यासाठी प्रेरणादायी ठरले. कारण एअर होस्टेस बनणारी केरळमधील पहिली आदिवासी महिला ठरली आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्म ते एअर हॉस्टेसपर्यंतचा प्रवास गाठणाऱ्या गोपिकाने एअर होस्टेस होण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले? याची कहाणी जाणून घेऊया.
एअर हॉस्टेस होण्याचे स्वप्न
केरळच्या अलाकोड येथील एसटी कॉलनी वाकुन कुडी येथे गोपिका गोविंदचा जन्म झाला. तिच्या वडिलांचे नाव पी गोविंदन, तर आईचे नाव व्ही.जी. गोपिका असे आहे. गोपिका ही केरळमधील करीम बाला या अनुसूचित जमातीत येणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलगी आहे. गोपिकाला तिच्या बालपणी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. इतर आदिवासी मुलींप्रमाणने गोपिकालादेखील आर्थिक, सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागत होता. असे असले तरी गोपिका तिच्या भविष्यासाठी स्वप्ने पाहत असे. आपण एअर हॉस्टेस होऊ, असे तिला वाटायचे.
तेव्हा स्वप्न सोडण्याचा निर्णय
गोपिकाच्या घराच्या छतावरून विमान जायचे. इतर मुले आनंदाने ओरडायची. पण गोपिकाला विमानाविषयी कुतूहल निर्माण झालं. इथलं काम कसं चालत असेल, एअर हॉस्टेस नेमकं काय करत असेल असे प्रश्न तिला पडायचे. आपण विमानाच्या आत जाव असं तिला वाटायचं. तिला हवेत उडण्याची स्वप्ने पडू लागली. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोपिकाने प्रयत्नही सुरू केले. पण हे तितके सोपे नव्हते. गोपिकाच्या आयुष्यात अशीही एक वेळ आली जेव्हा तिने आपले स्वप्न सोडण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारने केली मदत
गोपिकाला एअर होस्टेसचा कोर्स करायचा होता पण हा कोर्स खूप महाग असल्याचे तिला समजले. गोपिकाच्या एअर हॉस्टेस बनण्याच्या खर्च तिच्या कुटुंबाला परवडणारा नव्हता. त्यामुळे आपले स्वप्न आता स्वप्नच राहणार असे तिला काही क्षण वाटू लागले. पण सरकार अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षणात अनुदान देते, याबद्दल तिला कळाले. गोपिकाने IATA कस्टमर सर्व्हिस केअरमध्ये डिप्लोमा केला. नंतर वायनाडच्या ड्रीम स्काय एव्हिएशन ट्रेनिंग ॲकॅडमीत प्रवेश घेतला. या कोर्ससाठी सरकारने गोपिकाला एक लाख रुपयांची मदत केली. अथक प्रयत्न आणि सरकारच्या मदतीमुळे केरळमधील आदिवासी समाजातील गोपिका 12 वर्षांनंतर तिचे स्वप्न पूर्ण करु शकली.
एअर होस्टेस बनून तिने आपला परिवार आणि समाजाचे नाव उज्वल केले.