नोएडा निवासी भूखंड विभागाच्या किमान 16 कर्मचाऱ्यांना सीईओंनी शाळेतील शिक्षेची आठवण करुन दिली. नागरिकांना आपल्या काऊंटवर ताटकळत ठेवल्याबद्दल त्यांना तब्बल 20 मिनिटं आपल्या जागेवर उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ‘स्टँड-अप’ शिक्षेचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. नोएडचे सीईओ डॉ लोकेश एम यांच्या आदेशानुसार ही शिक्षा देण्यात आली. कर्मचारी काउंटरवर लोकांना दीर्घकाळ थांबवत असल्याने ते चिडले होते.
न्यू ओखला औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सुमारे 65 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या ठिकाणी नोएडामधील शेकडो रहिवासी दररोज विविध कामांसाठी भेट देतात. 2005-बॅचचे आयएएस अधिकारी असणाऱ्या डॉ लोकेश एम यांनी गेल्या वर्षी नोएडाचा कार्यभार स्वीकारला. ते अनेकदा या कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासत असतात. कर्मचाऱ्यांना ते वारंवार लोकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावू नका असं सांगत असतात.
In Noida Authority, an elderly couple was struggling to get their file approved but faced complete neglect. Witnessing this, the CEO took a bold step – ordered all employees to stand and work for 30 minutes as punishment!#CEO #Noida pic.twitter.com/RrZMOAc4xn
— Sneha Mordani (@snehamordani) December 17, 2024
सोमवारी सीईओंनी एका काउंटरवर एक वृद्ध माणूस उभा असल्याचं पाहिलं. यानंतर त्यांनी काउंटरवर असलेल्या महिला अधिकाऱ्याला ताबडतोब त्या वृद्ध व्यक्तीची दखल घेण्यास आणि वाट पाहायला लावू नका असं सांगितलं. जर त्याचं काम करता येत नसेल तर त्या व्यक्तीला तसं स्पष्ट सांगण्यासही त्यांनी सांगितलं.
सुमारे 20 मिनिटांनंतरही वृद्ध व्यक्ती त्याच काउंटरवर उभी असल्याचं सीईओंच्या लक्षात आलं. यामुळे नाराज होऊन सीईओ निवासी विभागात पोहोचले आणि त्यांनी काउंटरवरील सर्व अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. त्यानंतर त्यांनी सर्वांना 20 मिनिटं उभे राहून काम करण्यास सांगितलं. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सीईओंनी शिक्षा सुनावल्यानंतर अधिकारी, त्यात अनेक महिला, उभे राहून काम करताना दिसत आहेत.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सीईओंच्या कारवाईचं कौतुक केलं आहे. सरकारी कार्यालयांमध्ये त्वरित प्रतिसाद मिळावा यासाठी ही कृती गरजेची असल्याचं युजर्स म्हणाले आहेत.