PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच जागतिक स्तरावरील नेतेमंडळींशी संपर्क साधत त्या नेतेमंडळींशी आणि पर्यायानं विविध देशांशी असणारे नातेसंबंध सुधारण्यावर भर दिला. महासत्ता असो किंवा एखादं प्रगतीच्या वाटेवर असणारं राष्ट्र, पंतप्रधान मोदी यांनी कायमच जागतिक पटलावर त्यांची छाप सोडली. अशी एक आठवण त्यांच्या 2014 मधील ओबामा भेटीची.
अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय क्वात्रा यांनी ही आठवण सांगितली जिथं पीएम मोदी यांनी तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची लिमोसीन कार पाहून जगावेगळी प्रतिक्रिया दिली. ओबामांची कार ही आपली आई राहते त्या घराईतकी मोठी असल्याचं मोदींचं पहिलंच मत.
माजी परराष्ट्र सचिव असणाऱ्या क्वात्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी स्टोरी जगासमोर आणली. औपचारिक संभाषणानंतर मार्टिन ल्यूथर किंग यांच्या स्मारकाच्या दिशेनं पुढे जात असताना दोन्ही देशांतील प्रधान नेत्यांमध्ये हा संवाद झाल्याचं सांगितलं गेलं. बराक ओबामा यांच्या लांबलचक लिमोसिन या आलिशान कारमध्ये बसताच त्या 10 ते 12 मिनिटांच्या प्रवासामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये असणारी औपचारिकतेची सीमा विरून त्यांच्या गप्पांचा ओघ थेट कुटुंबाकडे वळला होता. मैत्रीच्या नात्यानं ओबामांनी मोदींच्या आईविषयी चौकशी करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या या प्रश्नांवर पंतप्रधानांनी अनपेक्षित उत्तर दिलं.
‘प्रेसिडेंट ओबामा… तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तुम्या कारचा आकार हा जवळपास माझ्या आईच्या राहत्या घराईतका आहे’, असं ते अगदी सहजपणे बोलून गेले. त्यांच्या या वक्तव्यानं ओबामा यांना अश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांचे डोळे चमकले. काही मिनिटांच्या त्या अनौपचारिक संवादामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावरील संस्कार त्यांचं आयुष्य आणि त्यांचा हजरजबाबीपणा समोर आला असं क्वात्रा यांनी सांगितलं. जे त्या भेटीदरम्यान भाषांतरकार म्हणूनही जबाबदारी निभावत होते.
क्वात्रा यांनी या भेटीतील अतिश खास संदर्भ आणि गोष्टी समोर आणल्या असून या संभाषणातून दोन्ही नेत्यांमध्ये असणारं अनेक बाबतीतील साधर्म्य समोर आलं. अगदी प्रामाणिक आणि सामान्य वळणावर प्रवास सुरू करून दोन्ही नेत्यांनी कशा प्रकारे दोन देशांमधील उच्च पदांचा पदभार सांभाळला हेच इथून स्पष्ट झालं.
माहितीसाठी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई, गुजरातमध्ये वास्तव्यास असून २०२२ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. आईसोबतचे अनेक क्षण पंतप्रधानांनी देशासमोर आणले आहेत. मग तो त्यांचा वाढदिवस असो किंवा एखादा खास सण असो.
दरम्यान, परदेश दौरे आणि पंतप्रधानांची एकंदर ख्याती पाहता जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय नेतेमंडळींसमवेत त्यांचा संवाद आणि त्यांचं एकंदर योगदान कायमच चर्चेचा विषय ठरतो असं मत सचिवांनी स्पष्ट केलं. शनिवारीच पंतप्रधान मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. जिथं त्यांनी क्वाड ग्रुपिंग परिषदेला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधानांदं संबोधनपर भाषणही सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत असून त्याच निमित्तानं त्यांचं अमेरिकेशी असणारं नातं एका खास किस्स्यासह जगासमोर आलं.