[ad_1]
Viral Video Wedding Gifts Rs 21 Crore: हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजही भारतात अनेक राज्यांमध्ये हुंडा घेतला जातो. भारतामधील हे दाहक वास्तव्य दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील आहे. राजस्थानमधल्या एका लग्नात नवरदेवाला तब्बल 15 कोटी रुपयांच्या भेटवस्तू देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या वस्तूंना भेटवस्तू म्हटलं असलं तरी अनेकांनी हा हुंडाच असल्याचा दावा करत व्हिडीओवरुन नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर फोटोग्राफर सोनू अजमेरने शेअर केला आहे. या व्हिडीओला 58 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये राजस्थानमधील तसेच मारवाडी समाजातील पारंपारिक विवाहसोहळ्यातील ‘मामेरा’ प्रथा पार पडत असताना दिसत आहे. या प्रथेदरम्यान वधूच्या माहेरची मंडळी नवरदेवाकडील मंडळींना महागड्या वस्तू भेट म्हणून देतात.
नेमकी काय आहे ही प्रथा?
मारवाडी समाजामध्ये मामेरा प्रथेला फार महत्त्व आहे. यामध्ये वधूचा मामा बहिणीच्या कुटुंबाला तसेच भाचीला लग्नानिमित्त महागड्या वस्तू भेट करतो. यामध्ये दागिने, कपडे, रोख रक्कम, संपत्ती यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. मात्र सध्या व्हायरल झालेल्या मामेरा प्रथेच्या व्हिडीओमध्ये नवरदेवाला देण्यात आलेल्या संपत्तीच्या मूल्याचा आकडा पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागांमध्ये आजही ज्याप्रमाणे लग्नातील आहेराची रक्कम सार्वजनिक पद्धतीने जाहीर केली जाते तशीच अधिकृत घोषणा मामेरा प्रथेआधी लग्नमंडपात होते. या घोषणेमध्ये मामेरा म्हणून वराला काय काय दिलं जात आहे उपस्थित वऱ्हाड्यांना सांगितलं जातं. व्हायरल व्हिडीओमधील घोषणेमध्ये 210 बिगा म्हणजेच 131 एकर जमीन, 3 किलो चांदी, 1.51 कोटी रुपये रोख आणि एक पेट्रोल पंप नवरदेवाला मामेरा म्हणून दिला जात असल्याचं जाहीर करण्यात आलं. “1 पेट्रोल पंप, 210 बिगा जमीन, 1 कोटी 51 लाख रोख रक्कम, एकूण 15 कोटी 65 लाख रुपयांचा मामेररा दिला जात आहे,” असं जाहीर करण्यात आलं. मात्र कपडे आणि इतर वस्तूंचा विचार केल्यास या लग्नात एकूण 21 कोटी रुपयांचा मामेरा देण्यात आल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे.
मुलगा करतो तरी काय? सर्वच स्तरातून होतेय टीका
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी एवढ्या मोठ्या रक्कमेच्या भेटवस्तू स्वीकारणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच जणांनी याचा केवढा आर्थिक ओझं मुलीच्या कुटुंबावर पडत असेल असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. एकाने तर उपाहात्मक टीप्पणी करताना, “मुलगा करतो तरी काय?” असा सवाल केला आहे. अनेकांनी अशाच पद्धतीचा प्रश्न विचारला आहे. अन्य एकाने, “लग्नात समाजिक पत जपण्यासाठी कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या जातात. मात्र घटस्फोटानंतर उदर्निवाहासाठी महिला पोटगी मागते तेव्हा तिला विरोध केला जातो,” असा टोला लगावला आहे. तिसऱ्याने तर, “लग्नात नवरदेवच्या घरच्यांनी नवरदेवाला विकलाय असं म्हणावं लागेल,” असा टोमणा मारला आहे.
मामेरा प्रथा हुंडा बंदी कायदा 1961 नुसार गुन्हा मानली जाते. मात्र अनेक भागांमध्ये अगदी जाहीरपणे घोषणा करत मोठ्या रक्कमेच्या वस्तू भेट म्हणून नवरदेवाच्या घरच्यांना दिल्या जातात.
[ad_2]
Source link