भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर (Border-Gavaskar Trophy) ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने सहा तर दुसऱ्या कसोटीत चार विकेट्स घेतल्या. सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आतापर्यंत त्याने 6 विकेट्स घेतले आहेत. पण एकीकडे जसप्रीत बुमराह फॉर्ममध्ये असताना दुसरीकडे इतर भारतीय गोलंदाज मात्र त्याला योग्य साथ देताना दिसत नाहीत. दरम्यान बुमराहने सोमवारी ऑस्ट्रेलियात संघर्ष करत असलेल्या भारतीय संघाची पाठराखण केली तसंच त्याच्यावरील अतिरिक्त दबावारही भाष्य केलं. आपला अनुभव पाहता अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणे हे आपलं काम आहे असं त्याने म्हटलं आहे.
जसप्रीत बुमराहला यावेळी भारतीय फलंदाजीबद्दलही विचारण्यात आलं. यावर त्याने उपहासात्मकपणे उत्तर दिलं. नेमकं त्याच्यात आणि रिपोर्टरमध्ये काय संवाद झाला हे जाणून घेऊयात.
रिपोर्टर: “हाय, जसप्रीत. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तू सर्वोत्तम व्यक्ती नसलास तरी फलंदाजीबद्दल तुझं मूल्यांकन काय आहे. तसंच गॅबातील परिस्थिती लक्षात घेता संघाच्या स्थितीबद्दल तुला काय वाटते?”
बुमराह: हा एक मनोरंजक प्रश्न आहे. पण, तुम्ही माझ्या फलंदाजीच्या क्षमतेवर शंका घेत आहात. तुम्ही गुगल वापरा आणि एका कसोटी षटकात कोणी सर्वाधिक केल्या आहेत ते पहा. पण, विनोद वगळता ही एक वेगळीच स्टोरी आहे”.
बुमराहने 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरोधात खेळताना स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा केल्या होत्या.
गब्बा येथील तिसऱ्या कसोटीत भारताने प्रथम गोलंदाजीचा चुकीचा निर्णय घेतला. बुमराहने 46 धावांत 6 गडी बाद केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पावसाचा फटका बसलेल्या भारतीय संघाने 51/4 अशी मजल मारली. बुमराह वगळता भारतीय फलंदाजांचे तंत्र आणि गोलंदाजीच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले.
बुमराह म्हणाला, “आम्ही एक संघ म्हणून एकमेकांकडे बोटं दाखवत नाही आणि आम्हाला त्या मानसिकतेत जायचं नाही जिथे आम्ही एकमेकांकडे बोटं दाखवत आहोत की ‘तुम्ही हे केले पाहिजे, तुम्ही ते केले पाहिजे”.
“आम्ही एक संघ म्हणून मोठ्या बदलातून जात आहोत. नवीन खेळाडू येत आहेत आणि क्रिकेट खेळण्यासाठी ही सोपी जागा नाही. येथे वेगळं वातावरण असल्याने वेगळं आव्हान आहे. त्यामुळे होय, आम्ही त्याकडे पाहत नाही,” असंही त्याने म्हटलं,