Border Gavaskar Trophy 2024: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा सध्याचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला निवृत्तीचा सल्ला दिला आहे. बुमराहने कसोटीमधून निवृत्त व्हावं असं शोएबने म्हटलं आहे. आपल्या करिअरचा कार्यकाळ वाढवायचा असेल तर बुमराहने कसोटी क्रिकेट सोडण्याची गरज असल्याचं शोएब अख्तरने म्हटलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेमध्ये चेंडू वळत घेत असलेल्या खेळपट्ट्यांवरही बुमराहला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नसल्याचं अख्तरने आवर्जून नमुद केलं. 4 डावांमध्ये बुमराहला केवळ 3 विकेट्स घेता आल्या. त्याला जखमी होण्याचा धोका पत्कारुन आपला गोलंदाजीचा वेग वाढवावा लागेल असं अख्तरने म्हटलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टिकून राहायचं असेल तर बुमराहला अधिक वेगाने गोलंदाजी करावी लागेल, असंही अख्तरने म्हटलं आहे.
बुमराहच्या भविष्याबद्दल चिंता
जसप्रीत बुमराह सध्या जगातील नंबर एकचा गोलंदाज आहे. 2023 च्या मध्यात त्याने पाठीच्या शस्रक्रीयेनंतर दमदार पुनरागमन केलं होतं. मात्र तेव्हापासून बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं विशेष लक्ष असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या कसोटीदरम्यान बुमराहला हॅमस्ट्रींगचा त्रास होत असल्याचं दिसून आलं. मात्र त्यामधून त्याने स्वत:ला सावरत दुसऱ्या सत्रातील गोलंदाजी अगदी योग्द पद्धतीने केली. मात्र त्यानंतरही शोएबने बुमराहच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजी वेगळी का? शोएबने सांगितलं
नक्षा खानच्या पॉडकास्टवर बोलताना शोएब अख्तरने, “तो (बुमराह) हा छोट्या फॉरमॅटमधील क्रिकेटसाठी एक उत्तम गोलंदाज आहे. तो एकदिवसीय सामन्यांमध्येही चांगली गोलंदाजी करतो. त्याला चेंडूचा टप्पा अखूड असावा की नाही याची चांगली जाण आहे. तो तळाच्या ओव्हरमध्ये फारच उत्तम गोलंदाजी करतो. तो पॉवर प्ले आणि दोन्ही बाजूला चेंडू वळत असतानाही भन्नाट गोलंदाजी करतो. मात्र कसोटीमध्ये तुम्हाला गोलंदाज म्हणून दिर्घ काळ सातत्याने गोलंदाजी करावी लागते. कसोटीत गोलंदाजी करताना तुम्ही वेगाने चेंडू फेकणं गरजेचं असतं कारण या फॉरमॅटमध्ये फलंदाज तुटून पडण्याच्या भूमिकेत नसतात,” असं म्हटलं आहे.
मी बुमराहच्या जागी असतो तर…
“कसोटीमध्ये चेंडूचा टप्पा फारसा महत्त्वाचा ठरत नाही. तुमच्या गोलंदाजीला वेग नसेल तर तुमचा चेंडू फारचा वळत नाही. तुम्ही अडखळता, गोंधळलेले दिसता तेव्हा लोक प्रश्न विचारु लागतात. मी जसप्रीत बुमराहच्या जागी असतो तर मी केवळ शॉर्ट फॉरमॅट क्रिकेटमध्ये खेळलो असतो. मला काय वाटतं यावर सारं काही अवलंबून असतं,” असंही शोएब म्हणाला.
Shoaib Akhtar wants Jasprit Bumrah to quit Test cricket.
“If Bumrah wants to continue playing Test,he has to increase the pace.With the injection of increasing pace,he has a high risk of getting injured.If I was him,I would have stuck to shorter formats”pic.twitter.com/cWppR28eKS
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) December 14, 2024
लवकर कसोटी क्रिकेट सोडावं लागणार?
बुमराह सध्या बॉर्डर गावस्कर चषकामध्ये उत्तम गोलंदाजी करत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 42 सामन्यांमध्ये 185 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहला कसोटीमध्ये दिर्घकाळ टिकून राहता येईल असं वाटत नसल्याचं मतही शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे. बुमराहला प्रकृतीसंदर्भातील समस्येमुळे कसोटी क्रिकेट लवकर सोडावं लागेल अशी शक्यता अख्तरने सूचकपणे व्यक्त केली आहे.