मध्य प्रदेशवर 5 गडी राखून विजय मिळवून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने आणखी एक विजेतेपद मिळवलं आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना पार पडला. अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मुंबई संघात होते.
अंतिम सामन्यानंतर श्रेयस अय्यरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने सध्या मुंबईचा आणि दिल्लीचा माजी सहकारी खेळाडू पृथ्वी शॉवर भाष्य केलं. स्पर्धेत पृथ्वी शॉने 9 सामन्यात फक्त 197 धावा केल्या. क्वार्टर फायनलमध्ये त्याने विदर्भाविरोधात केलेल्या 49 धावांनी संघाला स्पर्धेत पुढे जाण्यात मदत केली. दरम्यान आयपीएल मेगा लिलावात पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला आहे.
“माझं वैयक्तिक मत विचारलंत, तर तो देवाने कौशल्य दिलेला खेळाडू आहे. त्याच्याकडे जे कौशल्य आहे ते इतर कोणाकडे नाही. त्याने फक्त त्याच्या नैतिकतांवर काम करायला हवं,” असं श्रेयस अय्यरने म्हटलं आहे. पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करत नसल्यामुळे सतत त्याच्यावर टीका होत आहे. आपल्या कौशल्याचा तो योग्य वापर करत नसल्याचीही टीका होते.
“त्याने आपल्या कामाच्या नैतिकता योग्य प्रकारे ओळखणं गरजेचं आहे. आणि जर त्याने तसं केलं तर आकाशही ठेंगणं असेल,” असं अय्यर पुढे म्हणाला. या जोडीने चार वर्षांसाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. अय्यरच्या नेतृत्तात दिल्ली संघाने पहिला अंतिम आणि सलग तीन प्लेऑफ सामने गाठले आहेत. तथापि, शॉची शिस्त आणि जीवनशैली अलीकडील चिंतेचा विषय ठरला आहे ज्यामुळे त्याच्यात फार कोणी रस घेत नाही. 2025 च्या लिलावात कोणत्याही IPL संघाने त्याची निवड केली नाही.
पृथ्वी शॉ अद्याप फक्त 25 वर्षांचा असून, पुन्हा ती उंची गाठण्यासाठी काय करावं याबद्दलही श्रेयस अय्यरने सांगितलं आहे. “आम्ही कोणालाही बेबसिट करु शकत नाही. त्याने फार क्रिकेट खेळलं आहे. प्रत्येकाने त्याला आपल्या परीने सल्ले दिले आहेत. दिवसाच्या शेवटी आता त्यातून कसा मार्ग काढायचा हे त्याच्यावर आहे. त्याने भूतकाळात हे केलं आहे. त्याला हे जमणार नाही असं नाही. त्याने लक्ष केंद्रीत करावं. त्याने मागे बसून थोडा विचार करावा. त्याला स्वत:ला उत्तरं सापडतील. कोणीही त्याच्यावर काही करण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही,” असं तो म्हणाला आहे.