[ad_1]
Pakistan Test Captain Big Claim About Virat Kohli: पाकिस्तानी कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदने संघातील सलामीवीर अब्दुल्ला शफीकची पाठराखण केली आहे. 24 वर्षीय उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या शफीकची बाजू घेताना मसूदने त्याची तुलना थेट भारताच्या सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीशी केली आहे.
आपल्या फलंदाजाची घेतली बाजू
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने शान मसूदला कर्णधार म्हणून कायम ठेवलं आहे. पाकिस्तानी संघाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या या मालिकेमध्ये पाकिस्तानी सलामीवीर शफीकवर कठोर टीका झाली होती. शफीक या मालिकेतील चारही डावांमध्ये अपयशी ठरला होता. त्यामुळेच त्याच्यावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधाराने सलामीवीराची बाजू घेत तो विराट कोहलीपेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं आहे.
नेमका प्रश्न काय होता?
“आवडणारा आणि न आवडणारा यामधून आपण अजून बाहेर आलेलो नाहीत का? आपण त्यांना (कामागिरीमध्ये सातत्य नसलेल्या खेळाडूंना) पुन्हा पुन्हा संधी देत राहणार आहोत का? आता कमरा गुलामला पुन्हा संधी द्यायला नको का? अगदी अब्दुल्ला शाफीक असो किंवा सयीम आयुब असो तेच खेळाडू कसोटी आणि टी-20 सामने खेळतात,” असा प्रश्न पत्रकाराने कर्णधार शानला विचारला.
थेट कोहलीचं नाव घेतलं
या प्रश्नाला रिप्लाय देताना कर्णधार शानने कामगिरीमध्ये सातत्य नसलेल्या खेळाडूंची पाठराखण केली. शानने केवळ पाठराखण केली नाही तर आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आपल्याकडे काही आकडेवारी आहे असंही पत्रकारांना सांगितलं. “सर्व समान-सन्मान ठेवून मी सांगू इच्छितो की मला हा प्रश्न योग्य वाटत नाही. मी मान्य करतो की पाकिस्तानचा संघ 2024 मध्ये चांगलं आणि नावाला साजेसं क्रिकेट खेळलेला नाही. मात्र टी-20 आणि कसोटीचा एकत्रित विचार करणं योग्य नाही. गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे. तुम्ही आकडेवारीबद्दल बोललात तर मी त्या दिवशी 19 कसोटी सामने खेळलेल्या अब्दुल्ला शाफीकची आकडीवारी वाचली तर त्याची कामगिरी ही विराट कोहलीपेक्षा उत्तम आहे,” असं शान म्हणाला.
मी योग्य व्यक्तीला पाठिंबा दिला तरच…
“जेव्हा तुम्ही संघ तयार करता तेव्हा सर्व गोष्टींची जबाबदारी त्या संघाची असते. आता जबाबदारी माझी आहे. कर्णधार म्हणून मी सर्व त्रास सहन केला पाहिजे. केवळ मीच नाही सर्व सर्वांनीच तो त्रास सहन केला पाहिजे. असं झालं तरच काहीतरी घडू शकतं आणि मला यातून सकारात्मक काही निघालं तर आनंद होईल. मी एखाद्या खेळाडूची पाठराखण केली आणि त्याने उत्तम कामगिरी करुन भरपूर धावा करत पाकिस्तानी क्रिकेटची सेवा केली तर उत्तम होईल. हे करताना मला काही त्याग करावा लागला, माझं पद सोडावं लागलं तर मला त्याचीही परवा नाही. मी योग्य व्यक्तीला पाठींबा देत असेल तर मला शांत झोप लागेल. मी योग्य गोष्टींना पाठिंबा दिला तरच मी माझं आयुष्य शांततेत जगू शकेल,” असं शानने पत्रकारांना उत्तर देताना म्हटलं.
“If I back a player who becomes a good servant for Pakistan cricket and lose my own spot in the process, I will have no regrets.”
Shan Masood answered a question about Pakistan’s Test openers.#PAKvENG | #PakistanCricket pic.twitter.com/ecNlKGhssN
— Grassroots Cricket (@grassrootscric) September 30, 2024
नेमकी कसली तुलना केली पाकिस्तानी कर्णधाराने?
शानने शफीक आणि कोहलीची तुलना करताना दोघांनी आपआपल्या पहिल्या 19 कसोटींमध्ये कशी कामगिरी केलेली याची तुलना केली आहे. कोहलीने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केलं होतं. त्याने पहिल्या 19 कसोटींमध्ये 1178 धावा केलेल्या. त्यावेळी त्याची सरासरी 40.62 इतकी होती. तर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या चितगाव कसोटीमध्ये पाकिस्तानच्या कसोटी संघातून पदार्पण करणाऱ्या शफीकने त्याच्या पहिल्या 19 कसोटी सामन्यांमध्ये 1372 धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर सध्या 114 कसोटी सामन्यांमध्ये 8871 धावा आहेत. त्याची सरासरी 48.70 इतकी असून स्ट्राइक रेट 55.5 इतका आहे. त्याने कसोटीत 29 शतकं झळकावली आहेत.
[ad_2]
Source link