[ad_1]
Rohit Sharma Captaincy Record: रोहित शर्माने बुधवारी कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली. रोहितच्या चाहत्यांसाठी हा फार मोठा धक्का मानला जातोय. 38 वर्षीय रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. रोहितने 67 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि या काळात त्याने 12 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली. रोहितने 40.57 च्या सरासरीने 4301 धावा केल्या आहेत. गेल्यावर्षीच्या विश्वचषकानंतर रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे.
रोहितने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या कसोटी कॅपसह एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, ‘सर्वांना नमस्कार, मी फक्त हे शेअर करू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होतोय. पांढऱ्या जर्सीमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.’ गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन.’
रोहितने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ईडन गार्डन्सवर कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच डावात शतक झळकावले. सुरुवातीला तो मधल्या फळीतील फलंदाज होता. पण सातत्य राखण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. 2019 मध्ये तो सलामीवीर बनला आणि त्याला सूर गवसला. रोहितने 2021 मध्ये शानदार कामगिरी केली आणि 47.67 च्या सरासरीने 906 धावा केल्या. असे सर्व सुरु असताना 2024 मध्ये त्याचा फॉर्म घसरला आणि गेल्यावर्षी त्याने फक्त 24.76 च्या सरासरीने धावा केल्या.
रोहितचा शेवटचा सामना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना होता. ज्यामध्ये भारताचा पराभव झाला. मालिकेतील पाचव्या सामन्यातून रोहितला वगळण्यात आले होते.
कर्णधार म्हणून रोहित शर्माचा कसोटीतील विक्रम
2021 मध्ये विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर रोहितने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. कसोटी कर्णधार झाल्यानंतर टीम इंडियाचा पहिलाच सामना श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत होता. त्याने 2021/23 च्या सायकलमध्ये भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले खरे पण जेतेपदाच्या सामन्यात टीम ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. भारताने प्रथम वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकली आणि नंतर 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4-1 असा विजय मिळवला. असे असताना न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत 0-3 असा पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा 1-3 असा पराभव यामुळे रोहितवरील दबाव वाढला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 24 सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर या काळात भारताने 9 सामने गमावले आहेत. तर तीन सामने अनिर्णित राहिले. रोहितने या काळात 1254 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 30.58 इतकी होती आणि त्याच्या बॅटमधून फक्त 4 शतके झाली.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील सिरिज
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या मालिकांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. घरगुती मालिकेत श्रीलंकेचा 2-0 असा पराभव केला. बांगलादेशला 2-0 अशी मात दिली. ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवला. WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. यानंतर वेस्ट इंडिजवर 1-0 असा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 1-1 असा बरोबरीत खेळ झाला. इंग्लंडला 4-1 ने हरवले. बांगलादेशला 2-0 ने हरवले. न्यूझीलंडकडून 0-3 असा पराभव झाला. तर ऑस्ट्रेलियाकडून 1-3 असा पराभव रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला पत्करावा लागला.
[ad_2]
Source link