फोन वापरताना तुम्हालाही असा अनुभव आला असेल की, तुमचा स्मार्टफोन तुमचे बोलणे ऐकतो. आणि त्यासंबंधीत जाहीराती तुम्हाला दिसतात. पण हे नेमके कसे होते? फोन तुमचे बोलणे कसे ऐकतो हे जाणून घेऊया…
ज्या कंपनीच्या क्लायंटमध्ये फेसबुक आणि अॅमेझॉन यांचा समावेश आहे त्यांनी मान्य केले आहे, की असे एक बोलणे ऐकणारे सॉफ्टवेअर आहे. जे युजरच्या डिव्हाइसवर जाहिराती दाखवते. बोलणे ऐकणारे सॉफ्टवेअर हे एक तंत्रज्ञान आहे जे डेटा गोळा करण्यासाठी फोनचा मायक्रोफोन वापरते. हे तंत्रज्ञान 470 पेक्षा जास्त स्त्रोतांकडून वर्तणूक आणि व्हॉइस डेटाचे विश्लेषण करते. मेटा आणि ॲमेझॉनने हा प्रकार रोखण्यासाठी आधीच पावले उचलली आहेत.
तुम्हाला कसे कळेल की तुमचा फोन तुमचे संभाषण ऐकत आहे? हे समजून घेण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता. पण आता आहे. एका मार्केटिंग कंपनीने स्पष्ट केल्यावर अनेक दिवसांपासून असलेला संशय खरा ठरला आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी या फोनमध्ये सॉफ्टवेअर असते. ज्या कंपनीचे क्लायंट गुगल आणि फेसबुक आहेत, त्यांनी मान्य केले आहे की माहिती गोळा करण्यासाठी फोनच्या मायक्रोफोन वापर केला जातो. याचा अर्थ जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांशी नवीन फोन खरेदी करण्याबाबत बोललात, तेव्हा तुमचा फोनही हा संवाद ऐकत असतो. आणि मग तुम्ही फोन कसा, कुठे, कोणत्या कंपनीचा खरेदी करू शकता अशी सगळी माहिती सांगणाऱ्या जाहिराती तुम्हाला दिसायला सुरूवात होते. आपण फोन विषयी गुगल केले असेल म्हणून जाहिराती दिसत आहेत असा विचार करून तुम्ही ते सोडून देतात. पण हे तसे नसते. 404 मीडियाने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, तुम्ही फक्त काय शोधता एवढंच नाही तर तुम्ही फोनजवळ जे काही बोलता त्यावरूनही तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात.
ऐकण्याचे सॉफ्टवेअर म्हणजे काय?
कॉक्स मीडिया ग्रुपच्या एका अहवालानुसार उघडकीस आले आहे की बोलणे ऐकण्याचे तंत्रज्ञान AI चा वापर करून रीअल-टाइम डेटा गोळा करते. त्यामुळे संभाषणांचे परीक्षण आणि विश्लेषण करून जाहिराती दाखवणे शक्य होते. त्यात लिहिले आहे की हे तंत्रज्ञान जाहिरातदारांना वर्तणुकीशी संबंधित डेटासह व्हॉईस डेटा गोळा करण्यासाठीही परवानगी देते, ज्यामुळे त्यांना अचूक ग्राहक ओळखता येतो. आणि योग्य जाहिराती दाखवण्यास मदत होते. एवढंच नाही तर ऑनलाइन सर्च वर राहिलेला डेटा ही यात गोळा केला जातो.
मेटा आणि ॲमेझॉनने उचलली पावले
मेटा आणि ॲमेझॉन थेट मार्केटिंग फर्मशी संबंधित असल्याने दोघांनीही यावर आवाज उठवला आहे. मेटा सांगते की हे सॉफ्टवेअर परवानगीशिवाय वापरकर्त्याचा डेटा गोळा करून वापरत आहेत. वापरकर्त्यांच्या विश्वासाशी तडजोड केली जात आहे. तर Amazon ने मार्केटिंग एजन्सीच्या डेटा प्रायव्हसी फियास्कोमध्ये कोणताही सहभाग घेण्यास नाकार दिला आहे. वापरकर्त्यांच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. त्यांच्या भागीदारांपैकी कोणीही या अटींचा भंग केल्यास ते त्वरीत कायदेशीर कारवाई करतील असेही स्पष्ट केले आहे.
कॉक्स मीडिया ग्रुपने एकदा पोस्टमध्ये म्हटले होते की तुम्ही काय विचार करत आहात हे आम्हाला माहित आहे. फोन आणि डिव्हाइसेससाठी तुमचे बोलणे ऐकणे हे कायदेशीर आहे. हे ऐकण्याचे सॉफ्टवेअर बऱ्याचदा दुर्लक्षित केलेल्या अटींमध्ये लपलेला असते. ज्याला आपण नवीन ॲप डाऊनलोड करताना किंवा अपडेट करताना घाईघाईने सहमती देतो. आणि मग हे सॉफ्टवेअर आपल्या बोलण्याचा डेटा गोळा करायला सुरूवात करते.