Cybercrime Awareness Caller Tune: मागील चार महिन्यांपासून कोणालाही कॉल केल्यानंतर पहिले काही सेकंद एक ठराविक कॉलर ट्यून सर्वांना ऐकायला मिळते. जनहितार्थ सरसकट ही कॉलर ट्यून वाजवली जात असली तरी आपत्कालीन परिस्थितीत फोन करायचा झाल्यास हे आधी कुठे ऐकत बसायचं असा आक्षेपही अनेकजण घेताना दिसत आहेत. असं असलं तरी या कॉलर ट्यूनचा खरोखरच सकारात्मक परिणाम झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे, तुमच्या बँक खात्यात मनी लॉड्रिंगचे पैसे आले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगणारे व्हिडीओ कॉल आल्यास सावध व्हा, अशा कॉलला बळी पडू नका, अशी कॉलर ट्यून केंद्र सरकारनेच सुरू करून सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात अशा डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यांची संख्या आता फारच कमी झाल्याचं ठाण्यात दिसून येत आहे.
गुन्ह्यांमध्ये मोठी घट
2024 च्या सप्टेंबर ते डिसेबर या चार महिन्याच्या तुलनेत जानेवारी व फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टच्या भीतीमध्ये व पर्यायाने गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात डिजिटल अरेस्टसंदर्भातील गुन्ह्यांची सप्टेंबर, डिसेंबरमधील 15 ते 20 ही संख्या जानेवारीमध्ये अवघ्या 4 गुन्ह्यांवर आली असून फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 3 पर्यंत खाली घसरला आहे.
मोहीम सुरू झाली
सायबर गुन्हेगारांनी तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंग झाले आहे, अशी भीती घालून डिजिटल अरेस्ट करून कोट्यवधी रुपये हडपण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. खऱ्याखुऱ्या पोलिसांसारखे व न्यायमूर्तीसारखे दिसणारे गुन्हेगार मोबाइलवरील व्हिडीओ कॉलमध्ये पाहून लोक भुलल्यानंतर केंद्र, राज्याने जनजागृतीची मोहीम जानेवारीपासून हाती घेतली. ठाणे आयुक्तालयात सायबर फ्रॉडचे ऑक्टोबरमध्ये 63, नोव्हेंबर 25, डिसेंबरमध्ये 62 गुन्हे, जानेवारीत 49, फेब्रुवारीत 37 गुन्हे दाखल झाले.
प्रलोभनांना बळी पडू नका
अनेक सायबर गुन्हेगार हे व्हिएतनाम, तैवान कंबोडिया, सिंगापूर, दुबई अशा देशांतून फसवणुकीचे प्रकार करतात. भारतातूनच गेलेले काही गुन्हेगार यामध्ये आहेत. पोलिस आणि डिजिटल अरेस्टच्या भीतीने बँक बॅलन्सवर डल्ला मारला जातो. अज्ञान, भीती आणि लालसा याचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे प्रलोभनाला बळी न पडता, भीती न बाळगता अनोळखी व्हिडीओ आणि व्हॉट्सअॅप कॉलला बळी पडू नका, असं आवाहन ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त पराग मणेरे यांनी केलं आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमधील गुन्हे
नोव्हेंबरमध्ये ऑनलाइन फ्रॉडचे 7, सोशल मीडिया फ्रॉड 14, आमिष दाखवल्याचा 1, ट्रेडिंगचे 15 असे 37 गुन्हे दाखल झाले. डिसेंबरमध्ये – फेक लोनचे 10, आमिषाचे 4, नोकरीचे आमिष 7, टास्कचे 7, ट्रेडिंगचे 22, आदीसह 62 गुन्हे दाखल झाले.
जानेवारी-फेब्रुवारीमधील गुन्हे
जानेवारीमध्ये फेक लोन 9, गिफ्ट 5, आमिष दाखवल्याचे 2, टास्कचे 12, ट्रेडिंगचे 17, पार्सल- डिजिटल अरेस्टचे 4 असे 49 गुन्हे तर फेब्रुवारीमध्ये-फेक लोनचे 5, गिफ्टचे 3, नोकरीचे 3, फ्रॉडचे 10, ट्रेडिंगचे 14, अरेस्टचे 3 असे 37 गुन्हे दाखल झाले.