Client Paid High Fee To Women Know Her Job: एका महिलेने केवळ 3 तास काम करण्यासाठी तब्बल 4 लाख रुपये घेतल्याचा दावा केला आहे. अकाऊंटवर पैसे आल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये 4 लाख 40 हजार रुपये या महिलेच्या बँक अकाऊंटवर जमा झाल्याचं दिसत आहे. हा दावा करणाऱ्या महिलेचं नाव आहे श्वेता कुकरेजा. अशाप्रकारे खात्यावर कामाचे पैसे आधीच जमा झाल्यावर काम करण्याचं अधिक समधान मिळतं आणि काम करावसं वाटतं, असंही श्वेताने म्हटलं आहे.
महिलेने नेमकं काय पोस्ट केलंय?
“मला 4,40,000 अंदाजे (5200 अमेरिकी डॉलर्स) रुपये या महिन्याला एका क्लायंटकडून मिळाले. मी या क्लायंटच्या सोशल मीडिया स्ट्रॅटर्जीवर काम करण्यासाठी केवळ 3 तासांचा वेळ दिला. असे काही दिवस असतात की ज्यामुळे काम करण्याचं अधिक समाधान मिळतं आणि सारं काही ठीक आहे असं वाटतं,” अशी कॅप्शन श्वेताने स्क्रीनशॉट शेअर करताना दिली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांनी या महिलेला, ‘तू काय काम करते?’ असा प्रश्न विचारला आहे.
अनेकांना पडले अनेक प्रश्न
श्वेताच्या या पोस्टला 7 लाख 93 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांचं लक्ष या पोस्टने वेधलं आहे. श्वेताला एवढी जास्त फी सोशल मीडिया स्ट्रॅठर्जिस्ट म्हणून मिळते हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. केवळ तीन तासांच्या कामासाठी जवळपास साडेचार लाख मिळणाऱ्या या महिलेचं नेमकं काम काय आहे जाणून घ्यायला नक्की आवडेल असंही अनेकांनी म्हटलं आहे. ही महिला नक्की कसली तज्ज्ञ आहे. तीन तासांमध्ये असं काय काम तिने केलं की तिला एवढे पैसे समोरुन देण्यात आले? असे प्रश्नही काहींनी विचारले आहेत. “तू केवळ 3 तास दिले असं म्हणत आहेत. तर हे तू केवळ तुझ्या पुरतं मर्यादित ठेवायला हवं होतं. आता हे वाचून तुझे क्लायंट फार समाधानी असतील असं वाटत नाही,” असं एकाने म्हटलं आहे.
I got paid INR 4,40,000 approx. ($5,200) from ONE client this month.
And spent ONLY 3 hours working on his social media strategy.
Days like these make the work more satisfying and make it all worth it. pic.twitter.com/M8Oc2NQ6aZ
— Shweta Kukreja (@ShwetaKukreja_) September 27, 2024
श्वेतानेच सांगितलं ती काय काम करते
टीकेवर रिप्लाय करताना श्वेताने, आपल्याला पैसे हे आपल्या ज्ञानाचे दिले जातात किती तास काम केलं याचे नाही, असं म्हटलं आहे. “अनेक वर्षांच्या अनुभवानंतर क्लायंट एवढे पैसे देतात. मी किती तास काम करते यावर फी अवलंबून नसते. त्यांना तासाच्या हिशोबाने पैसे द्यायचे असतील तर त्यांना अधिक स्वस्तात काम करणारे मिळतील,” असं श्वेता म्हणाली. “मी ज्या पद्धतीने क्लायंटला मदत करते त्यामधून त्यांना स्वत:ची ओळख ब्रॅण्ड म्हणून निर्माण करण्यास मदत होते,” असंही श्वेताने म्हटलं आहे. मात्र यानंतरही एकाने ‘ही रक्कम एखाद्या फ्रेशर्सच्या सीटीसीपेक्षाही अधिक आहे,’ असं म्हटलं.